राज्याचा आगामी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल- बाळासाहेब थोरात

0
380

अहमदनगर, दि. १४ (पीसीबी) –  लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये मोठा फरक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या जुन्यांचा मेळ साधत काँग्रेस राज्यात नव्या जोमाने उभी राहिलेली दिसेल. अनेकांच्या पक्षांतरानंतर रिक्त झालेल्या जागांवर तरुणांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. तसेच राज्याचा मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा दावा काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांना पक्षात संधी देण्याचे स्पष्ट करतानाच राज्यातील आगामी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल असे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर काही लोक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. त्याचा आगामी काळात काँग्रेसवर फारसा परिणाम होणार नाही. उलट त्यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या जागांवर तरुणांना काम करण्याची संधी मिळेल. कॉग्रेसवर यापूर्वी देखील अनेकदा आघात झाले. मात्र नवनेतृत्व आणि जनतेने पुन्हा काँग्रेसला उभे राहण्याची संधी दिली. त्यातून काँग्रेस नव्याने उभी राहिली आहे. काँग्रेस सोडून गेलेल्यांची चिंत्ता करण्याचे काहीच कारण नाही. यापुढील काळात नवे आणि जुने असे सर्व जण एक दिलाने काम करून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आणू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची स्तुती करताना त्यांनी चांगले काम केल्याचं सांगितलं.

येत्या दोन-तीन महिन्यात आम्हाला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अशा वेळी एक टीम असावी म्हणून अन्य पदाधिकाऱ्यांना संधी देत पक्षाने समतोल साधला आहे. आम्ही सर्व सहकारी एकत्र पद्धतीने सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कठीण काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली त्यांना ही खऱ्या अर्थाने संधी आहे. माझी निवड कठीण परिस्थितीत आणि कठीण काळात झाली आहे. ग्रामीण भागात शेतकरी कामगार सामान्य माणूस यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. शहरे कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे. महागाई वाढली आहे. पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे त्यात आणखी भर पडेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. बेरोजगारांच्या संखेत वाढ होत आहे. पाच वर्ष अपयशी ठरलेल्या सरकारसह सर्व प्रश्नावर पक्ष विचार घेऊन जनतेसमोर जाईल. यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.