Desh

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी वंदना चव्हाण यांना उमेदवारी निश्चित

By PCB Author

August 07, 2018

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) –  राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात आहे. उपसभापतीपदाची निवडणूक गुरुवारी (दि.९) घेण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षाकडे आणि विरोधकांकडेही संपूर्ण बहुमत नसल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वंदना चव्हाण विरुद्ध हरिवंश अशी लढत होणार आहे.

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एकूण १२३ मतांची गरज आहे. भाजप वरिष्ठ सभागृहात सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही एनडीएला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही मित्र पक्ष आणि काही अपक्ष यांची मदत घ्यावी लागणार आहे. तरच त्यांना ११५ हा बहुमताचा आकडा गाठता येईल. मात्र, १३ खासदार असलेली एआयडीएएमके कोणाच्या बाजूने मतदान करणार हे अजून निश्चित झालेले नाही.

दरम्यान, उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी नाव चर्चेत असणे हेच माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. पण सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एकमताने निर्णय घेतील. जो निर्णय होईल तो सगळ्यांनाच मान्य असेल, असे वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे. लोकसभेत सुमित्रा महाजन आहेतच आणि राज्यसभेतही एखाद्या महिलेला ही जबाबदारी मिळाली, तर आनंदच होईल. महिलांचे विषय, त्यांचे प्रश्न आम्ही सभागृहांमध्ये मांडत असतो पण अशा जबाबदारीने त्यात अजून वाढ होईल असे खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या.