Maharashtra

राज्यसभेचे रामदास आठवलेंना आश्वासन; दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळेंचा मार्ग मोकळा 

By PCB Author

March 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) –  दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार  संघातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी लढण्याची तयारी दाखवली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे रामदास आठवले यांनी माघार घेतली आहे.   

याबाबत आठवले म्हणाले की, दक्षिण मध्य मुंबईतून मी याआधी निवडून आलो होतो. त्यामुळे येथे मला संधी मिळावी, अशी इच्छा होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर माझे व मित्र पक्षांचे याबाबत चर्चादेखील झाली होती. त्यामुळे मला जागा मिळायला हवी होती. परंतु माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, तेव्हा त्यांनी मला राज्यसभेचे आश्वासन दिले आहे. तसेच मी कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा मुख्यमंत्र्यासमोर ठेवली आहे.

आठवले यांनी माघार घेतल्यामुळे  दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.   राहुल शेवाळेंच्या उमेदवारीला आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. आठवले याबाबत म्हणाले की, राहुल शेवाळे माझे चांगले मित्र आहेत. मी आणि माझे कार्यकर्ते शेवाळेंच्या प्रचारात सहभागी होणार आहोत. आम्ही त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.