संविधानाने दिलेली शपथ राज्यपाल विसरलेत का ? – असिम सरोदे

0
652

मुंबई,दि.१३(पीसीबी) – कायदेतज्ञ असिम सरोदे यांनी “राज्यपालांनी संविधानाच्या उद्देशाचं पालन करण्याची आणि कायद्याची बांधिलकी मानण्याची शपथ घेतलेली असते. ती शपथ ते विसरलेत आहेत का?” असा सवाल केला आहे.

राष्ट्रपती राजवट लावणं हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. राज्यपालांनी अस्तित्वात आणलेली प्रक्रिया संविधानाच्या उद्देशाला धरून नाही अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करता येईल, असं असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेकांना असं वाटतं की राज्यपालांच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते नाही. मात्र राज्यपाल संविधानाच्या उद्देशाला धरून काम करत नसतील तर त्यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला आव्हान दिलं जाऊ शकतं, असंही असिम सरोदे यांनी सांगितलंय.

राज्यपालांना घटनेनं विशेषाधिकार दिलेले आहेत. वेळेच्या संदर्भात त्यांच्यावर बंधन नाही. याचा अर्थ राज्यपाल भेदभावपूर्ण प्रक्रिया वापरू शकत नाहीत. राज्यपालांनी विविध पक्षांबाबत विषमतापूर्ण प्रक्रिया वापरणं नक्किच संवैधानिक अनैतिकता ठरते, असं असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.