राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी आघाडी आग्रही

0
189

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची तत्काळ नियुक्ती कऱण्यात यावी यासाठी राज्यातील आघाडी सरकारचे नेते आता विशेष आग्रही आहेत. त्यासाठी लवकरच राज्यपाल यांना भेटण्याचे ठरले आहे.

सोमवारी मुंबईत दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरवातीला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ठाकरे यांच्याशी याच विषयावर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे हे मंत्रीगण उपस्थित होते. ६ जून पासून या नियुक्त्या रखडल्या आहेत.

दरम्यान, या संदर्भात स्वतः राज्यपाल भगतसिंह कोशारी हे वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे आघाडीचे नेते याबाबत तत्काळ नियुक्त कऱण्याच्या आग्रही भूमिकेत आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी नियमाप्रमाणे विविध क्षेत्रातील तज्ञ, मान्यवर यांच्या नावांचीच शिफारस व्हावी, यासाठी राज्यपाल महोदय आग्रही असतील, अशी अटकळ आहे. दुसरीकडे आघाडी सरकारमधून नावांची शिफारस करताना राजकीय कार्यकर्ते अथवा विधानसभेला डावलण्यात आलेले नेते यांची नावे पुढे आल्याने आता हा कळीचा मुद्दा होणार आहे. मंत्रीमंडळाने त्याबाबत शिफारस केली तरी राज्यपाल त्याची छाननी करताना ती नावे ही कोणत्या क्षेत्रातील आहेत, त्यांचे योगदान काय आदी तपशिलात जाणार असे दिसते. त्यामुळे आघाडीचे नेते दबकत दबकतच संभाव्य राज्यपाल नियुक्त नावांबाबत चर्चा करत आहेत, असे समजले.