Maharashtra

राजेश्वर उदानी हत्या प्रकरणी मंत्री प्रकाश मेहता यांच्या माजी सचिवाला अटक

By PCB Author

December 08, 2018

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मुंबईतील व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला अटक करण्यात आली आहे. घाटकोपरमधील दागिन्यांचे व्यापारी राजेश्वर उदानी यांचा मृतदेह पनवेलच्या जंगलात आढळून आला होता. त्यावेळी एकच खळबळ उडाली होती.

राजेश्वर उदानी (वय ५७) २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. उदानींच्या नातेवाईकांनी पंतनगर पोलिस ठाण्यात उदानी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ४ डिसेंबरला पनवेल पोलिसांना नेरे गावातील जंगलात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह व्यापारी राजेश्वर यांचाच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी काल कपडे आणि बेल्टवरुन ओळखले होते.

पोलिसांनी यापूर्वी काही बारबाला आणि प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारची चौकशी केली होती. अपहरणानंतर राजेश्वर उदानींची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर सचिन पवारला अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचीही या प्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.