Maharashtra

राजेशाही असती तर, तुम्हाला कधीच दुष्काळाचा प्रश्न विचारण्याची वेळच आली नसती- उदयनराजे भोसले

By PCB Author

June 14, 2019

सातारा, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी पंढपूरमध्ये विठूरायाचे दर्शन घेतले. उदयनराजेंनी राज्यातील दृष्काळ निवारणासाठी विठूरायाकडे साकडेही घातले. आज राजेशाही असती तर मी कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेतला असता असे वक्तव्य उदयनराजे यांनी केले.

विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी राज्यातील दुष्काळाबद्दल चिंता व्यक्त केली. ‘देशात लोकशाही नांद आहे. त्यामुळे लोकशाहीत देशातील नागरिक राजे आहेत. त्यांनीच कष्टकरी शेतकऱ्यांना त्रासातून मुक्त करावे’ असे आव्हान त्यांनी यावेळी केले. पत्रकारांनी त्यांना दुष्काळाबद्दल प्रश्न विचारला असता, ‘मी राजकारण करायला इथे बसलेलो नाही. आज राजेशाही असती तर मी कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन मोकळा झालो असतो. तुम्हाला दुष्काळाचा प्रश्न विचारण्याची वेळच आली नसती. सगळे निवांत असते,’ असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले.

दुष्काळावर सर्वांनी मिळून तोडगा काढायला हवा अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. मी आज विठ्ठलाकडे दुष्काळाचे संकट दूर कर असे साकडे घालायला आलो आहे. दुष्काळातून सर्वांची मुक्तता करा’ असे मागणे आपण विठ्ठलाकडे मागीतले असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी उदयनराजेंचा सत्कार केला.