राजेंद्र गावित पालघरमधून लोकसभा निवडणूक लढवणार-उद्धव ठाकरे

0
658

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. आजच त्यांनी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली. श्रीनिवास वनगा यांना पालघरमधून शिवसेना लोकसभेचे तिकिट देणार हे नक्की होते. मात्र श्रीनिवास वनगा यांनी विधानसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत एक दिवस पाठवणार आहे. तूर्तास त्यांना विधानसभेवर पाठवण्याचे आश्वासन मी दिले आहे. तर पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपातून शिवसेनेत आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पालघर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेकडे आलेला आहे. गेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी सभेत जाहीरपणे सांगितले होते की श्रीनिवासला संसदेत पाठवायचे आहे. मात्र श्रीनिवासने विधानसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. दिलेले वचन मोडायचे नाही ही आमच्या घराण्याची खासियत आहे. मात्र श्रीनिवासने विधानसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने मी त्याला ते आश्वासन दिले आणि आता राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर करतो आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. तसेच लोकसभेसाठी पालघरमधून आता त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच श्रीनिवासला दिलेला शब्द आजही कायम आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. श्रीनिवासने जे काही मनोगत व्यक्त केले. त्याला विधीमंडळात काम करण्याची इच्छा आहे म्हणून या जागेबद्दलचा निर्णय बदलण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली. त्यानंतर मी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र असे असले तरीही माझ्यासाठी भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समान आहेत. पालघरमध्ये चांगले काम करायचे आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र गावित यांनी दिली आहे. भाजपात मी होतो, आता मी शिवसेनेत आलो आहे. मला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समान आहेत असेही गावित यांनी म्हटले आहे.