Maharashtra

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बसले आहेत; रघुनाथदादांचा घणाघात  

By PCB Author

December 04, 2018

सांगली, दि. ४ (पीसीबी) – राज्यातील अनेक शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर सत्ताधाऱ्यांची छाप आहे. त्यामध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी  आणि कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. यांच्यासह सर्वजण नेते सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बसलेले आहेत, अशी सडकून टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज (मंगळवार) येथे केली आहे.

एक रकमी एफआरपी मिळण्याबाबत त्यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पाटील  पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, ऊस गाळप झालेल्या दिवसापासून १४ दिवसांत साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी  देणे गरजेचे आहे. याची तातडीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. तरी, आता कुठे शासकीय कार्यालयावर चार दगड पडली आहेत. यापुढे काय होईल ते पहा, असा इशारा  पाटील यांनी यांनी यावेळी दिला.

दरम्यान, एफआरपीच्या मागणीसाठी दीड महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर अज्ञात व्यक्तीने केलेली दगडफेक आम्हीच केली होती, असा दावा रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही केला होता.