राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये निवडणूक सर्व्हे; खासदार संजय काकडेंचा अंदाज काय?  

0
931

पुणे, दि. १४ (पीसीबी) – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येणार नाही,   असा अंदाज व्यक्त करून पक्षाची नाराजी ओढवून घेतलेले राज्यसभेतील भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आता राजस्थानात विधानसभा निवडणुकीचा सर्व्हे करण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर  मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथेही सर्व्हे करणार आहोत, असे  सांगून तो पूर्ण झाल्यावरच आपला अंदाज जाहीर करू , असेही त्यांनी  म्हटले आहे. त्यामुळे ते कोणता अंदाज जाहीर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.  

काकडे यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकी अंदाज  वर्तवला होता. या निवडणुकीत भाजपला ९२ जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपला ९८ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येणार नाही, असा अंदाज त्यांनी  व्यक्त केला होता. त्यानंतर त्याच्यावर पक्षाने नाराजी व्यक्त केली होती.

राजस्थानात सर्व्हे करण्यासाठी त्यांनी पुण्यातून २४ जणांची टीमसोबत नेली आहे. तसेच तेथील काही विद्यार्थींची त्यांनी सर्व्हेसाठी मदत घेतली आहे. तेथील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान १ हजार लोकांशी संवाद साधण्यात येत आहे. राजस्थानात सत्तेवर कोण येणार आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी की राहुल गांधी योग्य आहेत, असे दोन प्रश्न सर्व्हेत विचारले जात आहेत. त्यासाठी रेल्वे स्टेशन, चहाची टपरी, रिक्षावाले, शिक्षक यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. सर्व्हे करण्यास आपल्याला पक्षाने सांगितलेले नाही.  तर आपल्याला असे सर्वेक्षण करण्याची आवड आहे,  असे काकडे यांनी सांगितले.