Desh

राजस्थान, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे भवितव्य अधांतरी

By PCB Author

May 28, 2019

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पक्षांतर्गत विचारमंथन सुरू असतानाच, पक्षाची सत्ता असलेल्या राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पक्षांतर्गत असलेली नाराजी आता उघड होऊ लागली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेऊ शकते, अशा वृत्ताच्या पार्श्वभूमीवर या दोन राज्यांतील काँग्रेस सरकारांचे भवितव्य अधांतरी आहे.

लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवामुळे कर्नाटकातील आमदार नाराज असून कर्नाटकातील काँग्रेस आमदार रमेश जरकिहोली आणि डॉ. सुधाकर यांनी अन्य काही पक्षनेत्यांसह भाजपचे नेते एस. एम. कृष्णा यांची त्यांच्या बेंगळुरूतील निवासस्थानी रविवारी भेट घेऊन काँग्रेस सरकार पाडण्याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे.

दुसरीकडे राजस्थान काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पक्षापेक्षा आपल्या मुलाच्या निवडणुकीसाठीच सगळा जोर लावल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, या पराभवाची जबाबदारी निश्चित करून संबंधित नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील अनेक मंत्रीच करत असल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसला राज्यात सत्ता असतानाही राजस्थानात २५ पैकी एकही जागा मिळवता आली नाही, तर कर्नाटकात अवघी एक जागा मिळाली.