राजस्थानात काँग्रेसला सुरूंग सचिन पायलट आज भाजपमध्ये

0
355

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) : मध्य प्रदेश नंतर काँग्रेसला राजस्थानमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, राजस्थानमधील काँग्रेसचे मोठे नेते सचिन पायलट उद्या भाजप पक्षात प्रवेश घेण्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेस, सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यास अपयशी ठरल्यामुळे सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाण्याच निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

माझ्याकडे 30 आमदाराचं समर्थन असून राजस्थानचे अशोक गहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचे काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले. कोणत्या 30 आमदारांचे समर्थन आहे, हे मात्र समजू शकले नाही. दुसरीकडे काँग्रेस सुत्रांनी रविवारी रात्री अशोक गहलोत यांच्या बैठकीत 90 आमदारांची उपस्थिती असल्याचा दावा केला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या साडेदहा वाजता बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नाही. मुख्यमंत्री गहलोत यांच्यासोबत यापुढे काम करणे अवघड असल्याचे पायलट यांच्या निकटवर्तीय यांनी सांगितले.

30 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा सचिन पायलट करत आहेत. तर दुसरीकडे अशोक गहलोत यांच्या गटात आमच्या संपर्कातही भाजपचे आमदार असल्याचा दावा काँग्रेस आमदार राजेंद्र गुड्डु यांनी केला आहे. ते म्हणाले की जितके आमदार जातील त्यापेक्षा जास्त भाजपचे आमदार आणू. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचेही ते म्हणाले.