राजस्थानात काँग्रेसचे काय होणार …

0
183

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) : काँग्रेसने सचिन पायलट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची राजस्थानचे उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. यानंतर राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ पक्षातील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यात जवळपास 300 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात जिल्हा आणि विभाग अध्यक्षांचा समावेश आहे. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीतील जवळपास 30 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिल्यानंतर पक्षाचे प्रभारी अविनाश पांडेय यांनी राज्याची पक्ष कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसह आता नव्या कार्यकारिणीची आणि विभाग आणि जिल्हा समितींची निवड करण्यात येईल. पांडेय म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या परवानगीशिवाय कुणीही माध्यमांशी बोलणार नाही.”
सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर राजस्थान युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिमन्यू पूनिया यांनीही राजीनामा दिला. पूनिया म्हणाले, “सचिन पायलट यांच्याकडे काँग्रसने दुर्लक्ष केलं आहे.” राजस्थान काँग्रेस संसदीय समितीने (PCC) पूनिया यांचा राजीनामा मंजूर केला आहे. तसेच त्यांच्या जागी अभिषेक चौधरी यांना राजस्थान NSUI च्या अध्यक्षपदी नियुक्त केलं.
अभिमन्यू पूनिया यांच्यासोबतच NSUI चे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य अनिल चोप्रा यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन पायलट यांच्यामुळेच राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झालं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

सरकार कोसळणार हे निश्चित –
अनिल चोप्रा म्हणाले, “सचिन पायलट यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. जर वेळीच काँग्रेसने सुधारना केल्या नाही, तर सरकार कोसळणं निश्चित आहे. गहलोत सरकारच्या काळात कोणतंही विकास काम झालं नाही. सचिन पायलट यांना पदावरुन हटवल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे. याआधी पक्षाच्या समितीतील 59 पदाधिकाऱ्यांनी सचिन पायलट यांच्यावरील कारवाईनंतर राजीनामे दिले आहेत. सचिन पायलट यांचे समर्थक पीसीसी सचिव प्रशांत सहदेव शर्मा आणि राजेश चौधरी यांनीही राजीनामे दिले आहेत.