राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाच्या ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
373

जयपूर, दि. १७ (पीसीबी) – राजस्थानमधील बहुजन समाज पक्षाच्या ६ आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये मायावतींना मोठा धक्का बसला आहे. या सर्व आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा  दिला होता. आता थेट काँग्रेसमध्येच प्रवेश केल्याने काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे.

बहुजन समाज पक्षाचे उदयपूरवाटी मतदार संघाचे आमदार राजेंद्र गुढा, नदबई मतदार संघाचे आमदार जोगेंद्र सिंह अवाना, नगर मतदार संघाचे आमदार वाजिब अली, करोली मतदार संघाचे आमदार लाखन सिंह मीणा, तिजारा विधासभा मतदार संघाचे आमदार संदीप यादव आणि आमदार दीपचंद खेरिया यांनी बसपाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. कर्नाटकमध्ये आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे.  तर महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडू लागले आहेत. तर राजस्थानमध्ये बसपाच्या  आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षा उभारी मिळाली आहे.

२०० जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०० आमदार आहेत. मित्र पक्ष राष्ट्रीय लोकदलाचा १ आमदार आहे.  तर १२ अपक्ष आमदारांनी काँग्रेसला बाहेरुन  पाठिंबा दिला आहे.