राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत समर्थकांवर आयकराचे छापे

0
196

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळच्या उद्योगपतींवर आयकर विभागाचे छापे पडण्यास सुरुवात झाली आहे. आयकर विभागाचे 200 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले. ही सर्व ठिकाणं अशोक गहलोत यांच्या निकटवर्तीयांची असल्याचं सांगितलं जात आहे.

अशोक गहलोत यांचे निकटवर्ती आणि ज्वेलरी फर्मचे मालक राजीव अरोरा यांच्या ठिकाणांवर आज (13 जुलै) सकाळी आयकर विभागाची पथक दाखल झाली. त्यांनी अरोरा यांच्या घरासह कार्यालयावर छापे टाकले. विशेष म्हणजे या छाप्यांची माहिती स्थानिय पोलिसांनाही देण्यात आली नव्हती. आयकर विभागाच्या पथकाने केंद्रीय राखीव पोलीस दलासोबत ही कारवाई केली. राजीव अरोरा यांच्या व्यतिरिक्त धर्मेंद्र राठोड यांच्या देखील घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली. धर्मेंद्र राठोड मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्ती मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांची चौकसी केली जात आहे. यात त्यांनी केलेल्या परदेशातील व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांच्या जवळपास 24 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. या कारवाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. या कारवाईतून भाजप राजस्थानमधील काँग्रेसचे गहलोत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासोबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता करण्यात आलेल्या या कारवाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.

राजीव अरोरा हे राजस्थान काँग्रेसचे आर्थिक व्यवस्थापन करतात. त्यामुळे आयकर विभागाने त्यांच्या विविध ठिकाणांवर केलेल्या छापेमारीचे अनेक अर्थ निघत आहेत. यावरुन राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रसही भाजपवर सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या या आरोपांचं खंडन केलं आहे. संबित पात्रा म्हणाले, “कोरोनामुळे आयकर विभागाची छापे टाकण्याची कारवाई थांबलेली होती. आता पुन्हा एकदा या कारवाईला सुरुवात झाली आहे. या छापेमारीचा आणि राजस्थानमधील राजकीय संकटाचा काहीही संबंध नाही.