“राजतिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”, सोशल मीडियावरील मेसेजमुळे भाजपची डोकेदुखी 

0
2470

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे पुरते पानीपत झाले आहे. या धक्कादायक निकालानंतर भाजपसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांना जोरदार धक्का बसला आहे.  त्यातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या“राजतिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”,  या  मेसेजने  भाजपसमोरची डोकेदुखी वाढली आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेतली आहे. त्यामुळे हिंदी पट्ट्यातील या तीन राज्यातील पराभव  भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.   त्यामुळे आता  नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीच्या  नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पक्षातंर्गत या दोघाविरोधात नाराजीची सूर उमटू लागला आहे. अमित शहा यांच्या पक्षातील हुकूमशाही वृत्तीवर पक्षातील नेते आतापर्यंत बोलण्यास धजत नव्हते. मात्र, पाच राज्यांच्या निकालानंतर शहांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी भाजपला घटक पक्षांना सोबत घेणे गरजेचे आहे. त्यासाठी घटक पक्षांना जुळवून घेणारे व त्यांच्याशी चांगला समन्वय असलेल्या    नेत्याची भाजपला गरज वाटू लागली आहे. केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते  नितीन गडकरी  यांच्याकडे घटक पक्षांशी चांगले संबंध आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भुषवले आहे. त्यामुळे गडकरी यांचे नेतृत्व पुढे आणण्यासाठी अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियात फिरवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.