‘राजकीय संन्यास घेणार नाही’; निवडणूक लढविणार नसल्याच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे घुमजाव

0
477

कोल्हापूर, दि. ७ (पीसीबी) – यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही,’ अशी घोषणा केल्यानंतर चोवीस तास उलटण्याच्या आधीच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या घोषणेवर घुमजाव केले आहे. ‘राजकीय संन्यास घेणार नाही’, असे स्पष्ट करतानाच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असा  खुलासा पाटील यांनी केला आहे. 

कोल्हापुरात गुरुवारी जिल्हा पोलिस दलातर्फे गणराया अॅवॉर्ड वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती. त्या संदर्भातील वृत्त  छापून आल्यानंतर पाटील यांनी हा खुलासा केला आहे.

कोल्हापुरात गेल्यावर्षी मी डॉल्बीच्या विरोधात भूमिका घेतली होती. डॉल्बीला विरोध हा काही माझा पर्सनल अजेंडा नव्हता. त्या मुद्द्यावर मला काही निवडणूक लढवायची नाही. माझी काही सामाजिक भूमिका आहे.  त्यामुळेच मी विरोध केला,  असे मी या भाषणात बोललो. निवडणूक लढवायची नाही, हे वाक्य वेगळ्या संदर्भाने आले होते. मात्र, त्याचा विपरीत अर्थ काढण्यात आला’, असे पाटील यांनी सांगितले.

राजकीय संन्यास घेणे हे आमच्या हातात नसते. भाजपमध्ये वेगळी शिस्त आहे. पक्ष सांगेल तेच करावे लागते. आम्ही निवडणूक लढवायची की नाही हे पक्षाच्या हातात असते, त्यामुळे निवडणूक न लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असे पाटील यांनी सांगितले.