राजकीय देणग्यांचा शिवसेनेपेक्षा मनसेकडे ओघ वाढला

0
2225

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – देशातील प्रादेशिक पक्षांना २० हजार आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या रुपात एकूण ९१.३७ कोटी रुपये ६,३३९ देणग्यांमधून मिळाले आहेत. यामध्ये आम आदमी पार्टी, जेडीएस या पक्षांना चांगला निधी मिळाला आहे. तर शिवसेनेच्या देणग्यांमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. तर मनसेच्या देणग्यांमध्ये वाढ झाली आहे.  प्रादेशिक राजकीय पक्षांना २०१६-१७मध्ये मिळालेल्या देणग्यांची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने प्रसिध्द  केली आहे.  

प्रादेशिक पक्षांना २०१५-१७ या काळात मिळालेल्या देणग्यांच्या तुलनेत टॉप ५ पक्षांपैकी शिवसेनेच्या  देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे. यामध्ये ७० टक्के इतकी घट दिसून आली आहे. या काळात शिवसेनेला २९७ देणग्यांमधून २५.६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. शिवसेनेच्या तुलनेत महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या (मनसे) देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या देणग्यांमधून मनसेला १.४ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

आम आदमी पार्टीला सर्वाधिक ३,८६५ देणग्या मिळाल्या असून यातून त्यांना २४.७३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आपने ८.८२ कोटींचे दान परदेशातून प्राप्त झाले आहे. त्यानंतर शिरोमणी अकाली दल तिसऱ्या स्थानावर असून त्यांना ५८४२ देणग्या मिळाल्या आहेत. यातून पक्षाला १५.४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. शिवसेना, आप आणि अकाली दल या तीन प्रादेशिक राजकीय पक्षांना एकूण देणग्यांपैकी ७२.०५ टक्के हिस्सा अर्थात ६५.८३ कोटी रुपये मिळाले आहेत.

२५ प्रादेशिक पक्षांपैकी १८ पक्षांनी विनापॅनच्या माहितीद्वारे या देणग्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये आरजेडी, बीपीएफ, एमजीपी, पीएमके आणि जेडीएनपीने आपल्या अहवालात देणग्या देणाऱ्यांची माहिती दिलेली नाही. १०० टक्के करसूट मिळवण्यासाठी राजकीय पक्षांना ही माहिती देणे आवश्यक असते.