Maharashtra

राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच मी पवारांचा चाहता – व्यंकय्या नायडू

By PCB Author

June 23, 2018

बारामती, दि. २३ (पीसीबी) – पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून ग्रामीण पार्श्वभूमी, कृतिशीलता, लोकांची व प्रश्नाची सखोल जाण या गुणांमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा चाहता आहे. त्यांना ग्रामीण विकासाची सूक्ष्म माहिती असल्याने ते नवनवीन संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी संसदेतही सर्वांना अनुभवाच्या जोरावर मार्गदर्शन करतात. ग्रामीण विकास कृषी विकास महिला सबलीकरणास आकार देत साकार करण्याचे काम बारामतीत सुरू आहे. पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्याच्या औद्योगिक विकासासाठी भरीव योगदान दिले, अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शरद पवारांच्या कार्याचा शुक्रवारी बारामतीत गौरव केला.

उपराष्ट्रपतींनी कृषिविज्ञान केंद्र, शारदानगर शैक्षणिक संकुलातील अटल थिंक क्लबची पाहणी केली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार आदी उपस्थित होते. बारामतीचे कृषिविज्ञान केंद्र व शैक्षणिक प्रगती वाखाणण्याजोगी असून देशातील एक आदर्श कृषिविज्ञान केंद्र आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद कृषी तंत्रज्ञान विकासाचे काम करते. त्यांच्या प्रयोगशाळेतून शेतावर अधिकाधिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवण्याची गरज आहे. म्हणून आजकाल तंत्रज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम विकसित कृषिविज्ञान केंद्र विज्ञान केंद्र शेतावर पोहोचवत आहेत. बारामती कृषिविज्ञान केंद्र त्यापैकी एक आहे. देशातील प्रत्येक कृषिविज्ञान केंद्रातील वैज्ञानिकांनी बारामतीचा धडा घ्यावा. ग्रामीण जनजीवन बदलण्यासाठी कृषिविकास क्षमता वाढवावी लागेल. त्यासाठी कृषी संशोधन व तंत्रज्ञान देशभर चर्चा चालते. ते सर्व बारामतीत पाहायला मिळाले, असेही ते म्हणाले.