राजकीय अस्तित्वासाठी विलास लांडे यांची धडपड – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
648

 

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार हे जवळपास निश्चित आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासाठी आतापासून मोर्चेबांधनी सुरू केली आहे. दोन्हीकडे नेते, पदाधिकारी यांची अदलाबदल, नवीन नियुक्त्या, संभाव्य इच्छुक उमेदवारांची चाचपणी, अंदाज, आराखडे तसेच बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. त्या तुलनेत शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटात अद्याप विशेष हालचाली दिसत नाहीत. रिपाई आणि अन्य छोटे पक्षसुध्दा अद्याप गुहेत शांत बसून आहेत. या सर्व धबडग्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याची धावपळ डोळ्यात भरते आणि त्याचे आश्चर्यही वाटते. गेले सहा-सात वर्षे पडद्याआड गेलेले माजी आमदार विलास लांडे अचानक सक्रीय कसे झाले, याचे कोडे तमाम राजकीय धुरंधरांना पडले आहे. खरे तर, शहराच्या राजकारणातील एक धुरंधर, मुरब्बी अंगाला तेल लावलेला नेता अशी त्यांची ओळख. लांडे पाटलांची अपयशाची मालिका झाली, थोडक्यात उतरती कळा लागली. अशा परिस्थितीत ते पुन्हा नव्या दमाने जोर बैठका काढून लागल्याने अनेकांच्या भुवया वर गेल्या. सतत नकार घंटा वाजल्याने आता पुन्हा ते उभारी घेणार की कायमचे संपणार याची उत्कंठा अनेकांना आहे. घोडेमैदान जवळ आहे.

राष्ट्रवादीचे नवे सूत्र, नवे कोरे चेहरे –
दोन वेळा नगरसेवक, महापौर, दोन वेळा आमदार (जुना हवेली आणि नंतर नवीन भोसरी मतदारसंघ) असा ३० वर्षांचा राजकीय प्रवास करून सहा-सात वर्षे विलासराव एकदम विजनवासात गेले होते. उमेदवारी मिळाली नाही तर सरळ बंडखोरी करून मैदान मारायचे हा त्यांचा नेहमीचा खाक्या. वर्षापुर्वी लोकसभेसाठी त्यांच्या जागेवर अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना संधी मिळाली आणि लांडे पाटलांची सद्दी संपली.

शिवसेनेची तीन वेळा खासदारकी घेतलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना डॉ. कोल्हे यांनी मोठ्या मताधिक्याने पाडले. तेव्हा पासून डॉ. कोल्हे पर्व सुरू झाले. पंधरा दिवसांपूर्वी डॉ. कोल्हे शहरात आले आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतला. आता आगामी काळात अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या ऐवजी थेट डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे शहराची सुत्रे जाणार असा संदेश शहरात गेला. तेव्हापासून लांडे पाटलांनी पुन्हा तालिम सुरू केली आणि जोर बैठकांचा धडाका लावला. दुसरे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षांची खांदेपालट होणार अशी आवई उठली. म्हणजेच संजोग वाघेरे पाटील यांची गच्छंती होणार. त्या जागी आपली वर्णी लागावी यासाठी विलास लांडे यांनी पुन्हा नव्या दमाने काम सुरू केले, असेही म्हणतात. मुळात वारंवार पराभव वाट्याला आलेला असताना राष्ट्रवादी लांडे यांना पुन्हा संधी देईल का, याबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश विद्यार्थी संघटनेची धुरा सुनिल गव्हाणे यांच्यासारख्या तरुणाच्या खांद्यावर दिली. याचाच अर्थ राष्ट्रवादीने नवे सूत्र स्विकारलेले दिसते. स्वतः शरद पवार अजित पवार यांच्या बोलण्यात तेच येते. नव्या चेहऱ्यांना संधी, ७० चक्के नवे उनेदवार. कोरी पाटी असलेल्या अगदी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते आहे. यापेक्षा सुज्ञास सांगने न लगे.

लांडे संधी देत गेले, महेश लांडगे घेत गेले –
विलास लांडे पाटील यांच्यात इतकी धमक होती की, ते या शहराचे सर्वसंमत लोकनेते होऊ शकले असते. त्यांना ती संधी वेळोवेळी मिळाली, पण त्यांनी ती हातातून घालवली. पराभवाची कारण मिंमासा त्यांनी कधीही केली नाही. परिणामी समर्थक विखुरले आणि दुसऱ्या गटाला मिळाले. विलासरावचे भाचे जावई आणि आताचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं केलं. ते दुसऱ्यांदा ७० हजाराने जिंकले. अफाट जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे, विकास कामांची रेलचेल, प्रसिध्दीची झोत स्वतःवर ठेवण्याचे तंत्र असे सगळे अगदी पध्दतशीर अवलंबिले. त्याचा परिणाम लोक लांडे पाटील विसरले आणि महेश लांडगे यांच्या मागे गेले. मुळात लांडे पाटील यांनी पराभवा नंतर जनसंपर्क तोडल्याने ते खचले, असा संदेश तळागाळात गेला. नेमक्या त्याच संधीचा फायदा घेऊन सर्व राजकीय अवकाश महेश लांडगे यांनी व्यापले. आता पुन्हा तिथे स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे म्हणजे डोंगर पोखरून उंदिर काढण्यासारखे आहे. मुळात संपलेल्या लांडे पाटील यांनी आता पुन्हा शड्डू ठोकला तरी गावच्या आखाड्यात त्याचा आवाजच येत नाही, हे त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे.

पराभवाची मालिका असताना … –
लोकसभेच्या निवडणुकिला २००९ मध्ये शिवाजीराव आढळराव यांच्याकडून आमदार लांडे यांचा दणदणीत पराभव झाला. नंतर पुढे २००९ च्याच विधानसभेला राष्ट्रवादीने मंगला कदम यांनी उमेदवारी दिली. त्यावेळी स्वभावानुसार विलासशेठने बंड केले आणि अपक्ष अर्ज भरला. अवघ्या १२०० मतांनी निवडणूक कसाबशी जिंकली. एक प्रकारे तो लांडे यांचा नैतिक पराभवच होता. उतरती कळा लागल्याचेच ते लक्षण होते. नव्याने निर्माण झालेल्या भोसरी मतदारसंघाचे ते पहिले आमदार झाले. २०१४ मध्ये लोकसभेसाठी पुन्हा जोमाने तयारी केली, पण पक्षाने भिमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम या नव्या चेहऱ्याला संधी दिली. २०१४ च्या विधानसभेला पक्षाने लांडे पाटीलांना संधी दिली. त्यांचाच चेला असलेल्या महेश लांडगे यांनी गुरुची विद्या गुरुला हे तंत्र वापरले आणि बंडखोरी केली. मतविभागनी झाली आणि अपक्ष महेश लांडगे जिंकले, विलासशेठचा पराभव झाला. त्याची कारणे लांडे यांनी शोधायला हवी होती. सारा भोसरी गाव त्यांच्या विरोधात गेला आणि एकजुटीने महेश लांडगे यांच्या पाठीमागे उभा राहिला. कारण लांडे आमदार असताना त्यांच्याच घरात पत्नी महापौर, भाऊ नगरसेवक होते. एकाच घरात तीन तीन पदे होती. नेहमी स्वतःच्या सोयिचे राजकारण केले ते त्यांना नडले. जे जे त्यांच्या बाजुला होते ते कार्यकर्ते महेश लांडगे यांच्या मागे गेले, कायमचे दुरावले. राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी अखेर लांडे पाटलांनी विधान परिषदेसाठी चाचपणी केली. अनिल भोसले यांच्या जागेवर होणाऱ्या विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून भरपूर प्रयत्न केला. तिथेही पदरी निराशाच आली. उमेदवारी अर्ज भरला होता तो नंतर आपसूक माघार घ्यावा लागला. नंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकित मुलासाठी भोसरी गाव सोडून त्यांना थेट इंद्रायणीनगरला मतदारांना कधी नव्हे इतकी हाजीहाजी करावी लागली. चिरंजीव जिंकले पण ज्या समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली होती त्यांच्यासाठी वेळ देता आला नाही. भोसरी विधानसभेत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. इथेही आमदार महेश लांडगे यांच्यामुळे भाजपची सरशी झाली. अशा प्रकारे इजा, बिजा, तिजा झाला.

आता पुन्हा चढाई की आयुष्यभर लढाईच –
२०१९ मध्ये पुन्हा विलासशेठने लोकसभेसाठी माहोल तयार केला होता, पण पुन्हा नकार आला आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा कोराकरकरीत चेहरा राष्ट्रवादीने दिला. त्यातून नाराज झालेल्या लांडे यांनी प्रचारातून अंग काढून घेतले. अजित पवार यांचा तो फॉर्मुला यशस्वी ठरला आणि कोल्हे भरघोस मतांनी आढाळराव यांच्या विरोधात जिंकले. राजकारणात कायम टिकून राहण्यासाठी २०१९ च्या विधानसभेला लांडे यांनी थेट शिवसेनेशी संधान केले. मातोश्री च्या दरबारात जाऊन चाचपणी केली. शिवसेनेनेही नकार दिला आणि युतीच्या जागा वाटपात मतदारसंघही भाजपला गेला. महेश लांडगे यांनी भक्कम पाय रोवले होते आणि विलासशेठ पाच वर्षे गायब होते. विधानसभेला राष्ट्रवादीने मिनतवारी करूनही उमेदवारी घेण्याची हिंमत लांडे पाटील यांनी दाखवली नाही. दुसऱ्या बाजुने पुन्हा विधान परिषदेसाठी प्रयत्न केला आणि तोही फसला. आघाडीचे सरकरा आल्यावर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकऱण अध्यक्षपदासाठीही त्यांनी खूप आटापीटा केला. त्याची ना दादांनी दखल घेतली ना साहेबांनी. हे असे का झाले, तर निव्वळ स्वकेंद्रीत राजकारण केले. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले, त्यामुळे त्यांचे वलय कमी झाली, समर्थकही दुसऱ्या गटात सामिल झाले. आता राजकीय अस्तित्वाचा हा अखेरचा लढा आहे, तो विलासशेठ जिंकणार की पुन्हा ये रे माझ्या मागल्या ते पाहू.