‘राजकारण कधी सोडणार, आम्ही राजीनाम्याची वाट पाहतोय’; सिद्धूंना पोस्टर्समधून विचारणा

0
603

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – ‘राहुल गांधी जर अमेठीतून हारले तर आपण राजकारण सोडू’ असे लोकसभा निवडणुकीदरम्यान बेधडक विधान करणारे पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू याच विधानासाठी टीकेचे धनी ठरत आहेत. जनतेनेच आता त्यांना आपले वक्तव्य कधी खरे करुन दाखवताय? असा प्रश्न पोस्टर्सच्या माध्यमातून विचारला आहे.

पंजाबच्या मोहाली शहरातील काही घरांच्या भिंतींवर सिद्धूंना प्रश्न विचारणारे पोस्टर्स त्यांच्या छायाचित्रांसह चिकटवण्यात आले आहेत. यावर ‘तुम्ही राजकारण कधी सोडत आहात, आम्ही तुमच्या राजीनाम्याची वाट पाहत आहोत,’ असे लिहिले आहे. इंग्रजी आणि पंजाबी भाषेत ही पोस्टर्स तयार करण्यात आली आहेत.

शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत ही पोस्टर्स भरत असल्याने लोक या पोस्टर्सजवळ जाऊन ती वाचतानाही दिसत आहेत. त्यामुळे आपल्या आक्रमक बाण्यासाठी ओळखले जाणारे सिद्धू आता त्याच आक्रमकपणामुळे टीकेचे धनी ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान, अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात उभ्या असलेल्या भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांच्यावर टीका करताना सिद्धू यांनी राहुल गांधी जर अमेठीतून निवडून आले नाही तर मी राजकारण सोडेन असे बेधडक विधान केले होते.