“राऊत माझे मित्रं. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी”; राऊतांच्या टीकेवर पाटलांचा टोला

0
309

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

भाजपकडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला. हरकत नाही. कोणी 100 कोटी आणि 50 कोटीचे दावे करत आहेत. आता हे सव्वा रुपयाचा दावा करत आहेत. संजय राऊत माझे मित्रं असल्याने मी त्यांना सूचवेन की किंमत थोडी वाढवावी लागेल. कारण शेवटी मानहानीचा दावा म्हणजे काय? माझी मानहानी झाली ती मानहानी एवढ्या कोटीची आहे, असा मानहानीचा अर्थ होतो. राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नाही. त्यांनी ती मानहानी वाढवावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राजकारणात एकमेकांवर बोलावं लागतं. आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत. चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. मीही चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, असंही ते म्हणाले.राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, असं काँग्रेसने अप्रत्यक्ष म्हटलं होतं. त्यासाठी राज्याची परंपराही काँग्रेसने सांगितली होती. त्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची परंपरा वगैरे तुम्हाला आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिलं नाही? राजीव सातव हे प्रविण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, संजय उपाध्याय, देवेंद्र फडणवीसांचे परम मित्रं होते. त्यामुळे सातव यांच्या पत्नीला तिकीट मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण तुम्ही रजनी पाटलांना तिकीट दिलं. त्यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहे. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावा केला. मात्र, काय ऑब्जेक्शन आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मी कशाला सांगू. उद्यासाठी काही हवं की नाही, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.राजकारणात काहीही होऊ शकतं. 56 वाले मुख्यमंत्री होतात. 54 वाले उपमुख्यमंत्री होतात. 44 वाले महसूल मंत्री बनतात. आमचे 106 आणि 13 अपक्ष आमदार म्हणजे 119 आमदार होतात. मग 119 वालेही राज्यसभेत जाऊ शकतात. उपाध्याय राज्यसभेत जाणारच. अजून अपक्ष मिळाले तर 127 किंवा 128 चा आकडाही आम्ही गाठू शकतो, असा दावाही त्यांनी केला.