रांचीच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची षटकारांची आतिषबाजी

0
360

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत तिसरे शतक झळकावत रोहित शर्माने संघातली आपली निवड सार्थ ठरवली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताचे ३ फलंदाज झटपट माघारी परतले होते. मात्र रोहित शर्माने आपला मुंबईकर साथीदार अजिंक्य रहाणेच्या साथीने द्विशतकी भागीदारी केली. २१२ धावांवर रोहित कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर एन्गिडीकडे झेल देऊन माघारी परतला. रोहितच्या या खेळीत २८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

या खेळीदरम्यान रोहित कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने ५१ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याने धोनीचा ७८ धावांचा विक्रम मोडला आहे.

रोहितने ९५ धावांवर असताना पिडीटच्या गोलंदाजीवर षटकार खेचत शतक झळकावले. तर दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रानंतर एन्गिडीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपले पहिले द्विशतक झळकावले. या खेळीने एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाकडून झळकावलेले हे तिसरे द्विशतक ठरले आहे. एका कसोटी मालिकेत भारताच्या ३ फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.