रहाटणी-पिंपळेसौदागरमधील पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा आंदोलनाचा इशारा

0
1004

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – रहाटणी-पिंपळेसौदागरमधील कुणाल आयकॉन रोड, शिवसाई रस्ता, रामनगर, आशिर्वाद कॉलनी या भागात व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्याची दखल घेऊन या भागाचा पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी दिला आहे.

यासंदर्भात नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “रहाटणी-पिंपळेसौदागरमधील कुणाल आयकॉन रोड, शिवसाई रस्ता, रामनगर, आशीर्वाद कॉलनी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसापासून कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तसेच उपाययोजनाही केल्या जात नाहीत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण १०० टक्के भरलेले असताना ऐन पावसाळ्याच्या दिवसात पिंपळेसौदागरमधील नागरिकांना पिण्याचे पाणी सुरळीतपणे मिळत नाही, ही शोकांतिका आहे. स्मार्ट सिटीच्या बाता करणाऱ्या महापालिकेला हे शोभणारे नाही. रहाटणी आणि पिंपळेसौदागर परिसरातील नागरिकांच्या मुलभूत गरजेचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे. तसेच हा प्रश्न तातडीने न सोडवल्यास महापालिकेविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.”