Chinchwad

रहाटणीत पत्नीचा वायरने गळा आवळून फरार झालेल्या पतीस अंधेरीतून अटक

By PCB Author

May 10, 2019

रहाटणी, दि. १० (पीसीबी) – पत्नीचा वायरने गळा आवळून खून करुन फरार झालेल्या पतीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास रहाटणीत घडली.  

उत्तम महादू जाधव (वय ३७, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर), असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. वंदना जाधव (वय ३०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिक शामराव वाघमारे (वय ३४, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम याला दारुचे व्यसन होते. त्याची पत्नी वंदना ही घरकाम करुन उदरनिर्वाह करत होती. तो पत्नीला वारंवरा मारहाण करायचा यामुळे काही दिवसांपूर्वी वंदना, त्यांचा भाऊ आणि वडिलांनी मिळून उत्तमला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून गुरुवारी (दि. ९) पहाटे वंदना मोरीमध्ये भांडी घासत असताना तिचा मागून येऊन इस्त्रीच्या वायरने गळा आवळून खून केला आणि पसार झाला. यानंतर सांगवी पोलिसांना उत्तम हा अंधेरीतील सुभाषनगर भाजी मंडई जवळ असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली.