Chinchwad

रहाटणीत किरकोळ कारणावरुन तरुणाला बॅट आणि सिमेंटच्या गट्टूने जबर मारहाण

By PCB Author

May 28, 2019

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून तिघा तरुणांनी मिळून एकाला लाकडी बॅट आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण करुन जखमी केले. ही घटना मंगळवार (दि.२७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रहाटणी रामनगर येथील माऊली प्रोव्हिजन स्टोअर्स समोर घडली.

आदित्य उर्फ केतन संजय दुर्गेवय (वय २०, रा. पिंपळे सौदागर सम्राटनगर, बुध्दविहार समोर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साईनात कांबळे (रा. रामनगर, कौतिक हॉटेल शेजारी, रहाटणी), संदीप घोलप (रा. आर्शिवाद कॉलनी, रहाटणी) आणि सुरज पाटोळे (रा. लोंढे चाळ, पिंपळे सौदागर) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी जखमी आदित्य आणि तिघा आरोपींमध्ये किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली होती. यामुळे रागावलेल्या तिघा आरोपींनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या आदित्यला लाकडी बॅट आणि सिमेंटच्या गट्टूने जबर मारहाण केली. यामध्ये आदित्य जखमी झाला असून वाकड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक चौगुले अधिक तपास करत आहेत.