रस्त्यात थुंकलात तर…

0
316

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक रस्त्यावर थुंकल्यास दंड आकारला जातो. करोनाच्या काळात महापालिकेने अनेक नागरिकांकडून हजारो रुपये दंड वसूल केला आहे. मात्र, तरीही अनेकांना याचं गांभीर्य कळत नाही. रविवारी रस्त्यावर थुंकणाऱ्या अशाच एका नागरिकाला पोलीस अधिकाऱ्याने अद्दल घडवली. एक जण रस्त्यावर थुंकला हे पाहून त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने संबंधीत व्यक्तीला रस्त्यावर थुंकणे आरोग्यास धोकादायक असल्याचे सांगताना त्याच्या रुमालाने रस्त्यावरील थुंकी साफ करायला भाग पाडले.

सविस्तर माहिती अशी की, सध्या करोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना तोंडाला हात लावावा असे वारंवार सांगितले जाते. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर थुंकू नये, ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचे वारंवार सांगितले जाते. महापालिकेनं अशा नागरिकांना दंडही ठोठावला आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे मोटारीने जात असताना मोरवाडी चौकात एक नागरिक रस्त्यावर थुंकताना दिसला. तेव्हा, निकाळजे यांनी वाहन चालकाला मोटार थांबवायला सांगत त्या नागरिकाला बोलावून घेतलं. तेव्हा तो घाबरलेल्या अवस्थेत होता.

या नागरिकाला निकाळजे यांनी रस्त्यावर थुंकण्याचे दुष्परिणाम सांगत चांगलेच सुनावले. तसेच त्याच्याच रुमालाने रस्त्यावरील त्याची थुंकी साफही करायला लावली. याचा व्हिडिओ सध्या व्हाट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यांवर थुंकू नये, असं आवाहन ही निकाळजे यांनी केलं आहे.