Maharashtra

रस्त्यांवरील ‘या छुप्या दहशतवाद्यांपासून सावधान’, मराठी कलाकारांचा संताप

By PCB Author

September 16, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी) राज्यातील रस्त्यांवरील खड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेल्याच्या घटना आजवर घडल्या. पण, यावर उपाययोजना करण्यास सरकार अपयशी ठरल्याचे नेहमीच समोर आले आहे. पावसाळा आणि खड्डे हे तर राज्याचे ठरलेले समीकरण, मुसळधार पावसानंतर तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि आपण केवळ रस्त्याच्या आणि खड्ड्यांच्या नावाने बोटे मोडत असतो.

पण, राज्यातील विचित्र, ओबडधोबड रस्त्यांचा आणि त्यावरील खड्ड्यांचा फटका केवळ सामान्यांनाच बसतो असे नाही. प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी व सुबोध भावे हे देखील राज्यातील खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत. राज्यांच्या रस्त्यांची स्थिती किती खराब आहे हे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट व्दारे मांडले आहे.

खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्ते बांधणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांचा प्रश्न काही सुटलेला नाही. आता प्रसिद्ध कलाकारांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यांची स्थिती थोडीफार का होईना सुधारली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.