रस्ते सफाई निविदेत रद्द करा; राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांचीही मागणी

0
381

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते यांत्रिक पध्दतीने साफ सफाई करण्याच्या कामांच्या निविदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनीही केली आहे. भाजपाचे तुषार कामठे यांनीही दोनच दिवसांपुर्वी या व्यवहारात गोलमाल असल्याचा आरोप करून निविदा रद्द करण्याची लेखी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

कलाटे यांनीही आयुक्त हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निविदा प्रक्रियेत स्पर्धा टाळण्यासाठी निविदा धारकांकडून प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे. एकमेकांच्या संगनमताने अधिकच्या खर्चाचे निविदा प्रस्ताव मनपाकडे सुपूर्द केले आहेत. याशिवाय सर्व निविदा धारक रिंग करून प्रत्येक निविदा धारकास एक प्रभाग या प्रमाणे दर भरणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. सध्या कोरोनाचे संकट पूर्ण राज्यावर असल्याने शासनाने ३३ टक्के अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच नव्याने निविदा प्रक्रीया न करण्याबाबत आदेश दिले गेल आहेत.
निविदा अत्यावश्यक आणि कोरोना निर्मलूना संदर्भात असल्याचे भासवून निविदा प्रसिध्दीस देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ मार्च पासून १७ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. व संचारबंदी अजून वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे राज्याची तसेच महापालिकेची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे हि निविदा प्रक्रीया राबविल्यास महापालिका आर्थिकदृष्टा अजून अडचणीत येईल. महापालिकेस अत्यावश्यक सुविधा पुरविताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे निविदा रद्द होणे अत्यावश्य आहे, असे कलाटे यांनी म्हटले आहे.

यापूर्वी हेच काम शहरातील बेरोजगार तरुण, स्वंयरोजगार संस्थेच्या माध्यमातून करीत होते. शहरातील तरुण सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून गेली १५ वर्षापेक्षा जास्त तरुण हे काम स्वंय रोजगार संस्था स्थापन करुन प्रामाणिकपणे करीत होते त्यांचाही रोजगार जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत, त्यात यांची सुध्दा भर पडेल. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आर्थिक परीस्थिती नाजूक असताना निविदा राबविणे शक्य होणार नाह. त्यामुळे निविदा रद्द करण्यात यावी. तसेच सध्या साफ सफाई करणा-या संस्थांनाच मुदतवाढ देण्यात यावी, म्हणजे स्वच्छतेचे काम अडणार नाही, अशी सुचना कलाटे यांनी पत्रात केली आहे.