Maharashtra

रसायनमिश्रित लाखो रुपयांचा आमरस एफडीएकडून जप्त

By PCB Author

May 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – सध्या आंब्यांचा मौसम सुरु असल्याने सहाजिकच अनेक आंबा प्रेमींचा आमरस (आंबेरस) खाण्याकडे ओढा असतो. त्यामुळे आमरसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही जण या मागणीचा गैरफायदा घेऊन अस्वच्छ जागेवर हा रस गोळा करत आहेत. तसेच रसामध्ये रासायनिक पदार्थ मिसळत आहेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मुलुंड येथील राज इंडस्ट्रीयल इस्टेट येथील विजय स्टोअर्स या आंब्याचा रस बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. या ठिकाणी आंब्याच्या रसात मिसळवण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ तसेच ८ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा ३ हजार ४२५ किलो आमरस जप्त केला आहे.

जप्त केलेल्या रसाचे काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रसामध्ये प्रमाणापेक्षा अधिक रासायनिक पदार्थ आढळल्यास ५ लाख रुपये दंड किंवा, दंड आणि तुरुंगवासाठी शिक्षा होऊ शकते.

दरम्यान आंब्याचा खुला रस किंवा पदार्थ विकत न घेता चांगल्या कंपनीचे पॅकिंग पदार्थ खरेदी केले तर आरोग्यास धोका निर्माण होणार नाही, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे.