रश्मी शुक्ला यांनी सरकारमधील ‘या’ दोन नेत्यांची नावे केली सीबीआयकडे उघड

0
329

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारकडून चौकशी होण्यापूर्वीच महाविकासआघाडीचा ‘कार्यक्रम’ उरकून टाकला, असे वक्तव्य भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले. काही दिवसांपूर्वी हैदाराबादमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने रश्मी शुक्ला यांची चौकशी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकासआघाडीतील दोन नेत्यांची नावं उघड केल्याचा गौप्यस्फोटही अतुल भातखळकर यांनी केला.

भातखळकर यांनी बुधवारी यासंदर्भात ट्विट करुन भाष्य केले. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा भातखळकर यांनी केला आहे. यापैकी एक अनिल म्हणजे देशमुख तर दुसरा अनिल म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे चेलेचपाटे आणि आणखी एक बडा नेता कोण असावा, याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवा, उत्तरं देते: रश्मी शुक्ला
एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल (आज) रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं.

महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.