Desh

रशियाकडून काय खरेदी करावे आणि करू नये हे तिसऱ्या देशाने सांगू नये-  एस. जयंशंकर

By PCB Author

October 01, 2019

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – रशियाकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या निर्णयावर भारत ठाम आहे. या खरेदी प्रक्रियेमुळे अमेरिका भारतावर निर्बंध घालण्याची भितीही निर्माण झाली होती. यादरम्यान, सोमवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट घेतली. “रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याची भारताला मोकळीक आहे. यामध्ये कोणत्याही देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आम्ही रशियाकडून काय खरेदी करावे किंवा करू नये हे तिसऱ्या देशाने सांगण्याची गरज नसल्याचे” परखड मत जयशंकर यांनी मांडले.

अमेरिकेच्या माध्यमांद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांना जयशंकर यांनी उत्तरे दिली. ठआम्ही सैन्य दलासाठी जी उपकरणे खरेदी करतो आणि ज्या ठिकाणाहूनही खरेदी करतो तो केवळ आमचा अधिकार आहे. भारताने कोणत्या देशाकडून काय खरेदी करावे किंवा नाही याचा अधिकार केवळ भारताचाच आहे. हे बाब सर्वांनी समजून घेणे हेच सर्वांच्या हिताचे आहे,” असे जयशंकर यावेळी म्हणाले.

एस-४०० ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून शत्रूची मिसाइल, फायटर विमाने अचूकतेने टिपण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील. भारताने रशियाकडून हे क्षेपणास्त्र खरेदी केल्यास भविष्यात उच्च तंत्रज्ञान सहकार्यात यामुळे अडचण निर्माण होऊ शकते असे संकेत अमेरिकन अधिकाऱ्याने दिले होते. तसेच या करारामुळे सीएएटीएसए कायद्यातंर्गत भारताला निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याविरोधात अमेरिकन काँग्रेसने हा कायदा बनवला आहे. अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरीदेखील केली आहे.