रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय पूर्ववत सुरू

0
254

निगडी,दि.२०(पीसीबी) प्राधिकरणातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे असा नावलौकिक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचलित रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय तसेच अभ्यासिका सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२० रोजी शासकीय आदेशानुसार पूर्ववत सुरू करण्यात आली. या प्रसंगी उद्योजक अरविंद खंडकर गीता खंडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, सचिव प्रदीप पाटील, ग्रंथालय कार्यकारिणी सदस्य, सावरकर मंडळ कार्यकारिणी सदस्य यांची उपस्थिती होती. यावेळी अरविंद खंडकर आणि गीता खंडकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून ग्रंथालय पुन्हा सुरू करण्यात आले. कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांच्या हस्ते वाचक आणि विद्यार्थी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मंडळाचे सचिव प्रदीप पाटील यांनी ग्रंथालय आणि अभ्यासिका यांच्या सुधारित कार्यप्रणालीविषयी माहिती देताना सांगितले की, रविवारची साप्ताहिक सुट्टी सोडून ग्रंथालय सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील; तसेच सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उघडी राहील. कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाचक, विद्यार्थी आणि अभ्यागत यांची नोंदणी करून शारीरिक तापमान, प्राणवायू (ऑक्सिजन) पातळी तपासली जाईल. प्रवेशद्वारापासून ठिकठिकाणी सॅनिटाईजरची व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी हातमोजे (हॅण्डग्लोज), पारदर्शक मुखकवच (फेस शिल्ड) आणि मुखवटा (मास्क)ची व्यवस्था करण्यात आली आहे. पुस्तकांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वयंचलित अल्ट्राव्हायोलेट किरण यंत्रणेतून पुस्तकांची तपासणी करून झाल्यावर दोन दिवसांनंतर पुस्तके कपाटात ठेवण्यात येतील. ग्रंथालय आणि अभ्यासिकेतील हवा निर्जंतूक करण्यासाठी एअर प्युरिफायरची सोय करण्यात आली आहे. इमारतीत येणाऱ्या प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ग्रंथालयाविषयी माहिती देताना ग्रंथालय कार्यवाह प्रदीप पाटील पुढे म्हणाले की, १४ फेब्रुवारी १९८५ रोजी रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी भाषेतील सुमारे ४८,५११ पुस्तके आहेत. तसेच २६ दैनिके आणि १२५ नियतकालिके असून सुमारे १५०० वाचक सदस्य या सुविधांचा लाभ घेतात. ग्रंथालयामध्ये वाचकांच्या सोयीसाठी स्पर्धा परीक्षा, संदर्भ ग्रंथ, पर्यावरण, महिला आणि बाल असे विविध विभाग केले आहेत. ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी ग्रामीण भागातील दोन ग्रंथालयांची निवड करून त्यांना रुपये १५०००/- ( रुपये पंधरा हजार फक्त ) किमतीची पुस्तके देणगीदाखल देण्यात येतात. कार्यक्रमाचा समारोप करताना कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या; तसेच परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ग्रंथालय तसेच अभ्यासिकेचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन केले.