Maharashtra

रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी पक्षात घरवापसी

By PCB Author

October 16, 2019

कोल्हापूर, दि. १६ (पीसीबी) – शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देऊन  सदाभाऊ खोत यांच्या ‘रयत क्रांती’मध्ये प्रवेश केलेले रविकांत तुपकर यांनी आज (बुधवार) स्वाभिमानी पक्षात  माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत   घरवापसी केली. यामुळे  खोत यांना ऐन निवडणुकीच्या  काळात  मोठा धक्का बसला आहे. 

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रविकांत तुपकर यांनी राजीनामा  देत सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. बुलडाण्यातील चिखली मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक  होते. परंतु ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट त्यांना घालण्यात आली. त्यामुळे ते अस्वस्थ होते.

अखेर त्यांनी आज २० दिवसानंतर स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला आहे. ते राजू शेट्टींचे कट्टर सर्मथक मानले जातात. अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत तुपकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी  खोत यांच्यासह भाजपला धक्का  देत घरवापसी केली आहे.