रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटी

0
870

मुंबई दि.३० (पीसीबी) – करोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी सरकारला हातभार म्हणून रयत शिक्षण संस्थेकडून दोन कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला जाणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन एकत्रित करून सुमारे दोन कोटींचा निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमुखाने घेतला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

“कोवीड-१९ या जागतिक महामारीचा सामना महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायत्ता निधी-कोवीड-१९ मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे. असे शरद पवार यांची स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.”

 

या अगोदरही राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचे एक महिन्यांचे वेतन सहाय्यता निधीसाठी देण्यात येईल, असा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. या संदर्भात काढलेल्या अधिकृत पत्रकात शरद पवार म्हणाले होते, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी आणि संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.”

विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले होते.