रमजान ईद साधेपणाने साजरी करा ,घरातच नमाज पठण करा – डॉ. पी.ए. इनामदार

0
372

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणून रमजान ईदचा सण साधेपणाने साजरी करावा ,घरातच नमाज पठण करावे,असे आवाहन शिक्षण तज्ञ, मुस्लीम सहकारी बँक आणि आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी आज पत्रकाद्वारे केले.

चंद्र दर्शनानुसार पुण्यात २५ किंवा २६ तारखेला ईद साजरी करण्यात येण्याची शक्यता आहे.रमजानच्या पवित्र महिन्यात केलेले रोजे(उपवास) ईदच्या दिवशी सोडले जातील.दर वर्षी मित्र परिवार, शेजाऱ्यांसमवेत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी ईद यावर्षी साधेपणाने साजरी करावी. पुणे शहरात कोरोना मुळे रोज नागरिक मृत्युमुखी पडत असताना सामाजिक भान राखून साधेपणाने राहावे, सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी,असे आवाहन डॉ.इनामदार यांनी केले आहे.

रमझान महिन्याच्या काळात मशिदींमध्ये सामुहिक नमाज पठण करू नये,घरीच नमाज पठन करावे, या आवाहनानुसार देशात मुस्लीम बांधवानी जबाबदारीचे पालन केल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रकाद्वारे मानण्यात आले आहे.