रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी पिंपरीत गुरुवारी आंदोलन

0
244

पिंपरी, दि. 19(पीसीबी) माननिय सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट पिटिशनवर दिलेल्या निकालामुळे देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) आरक्षण रद्द झाले आहे. रद्द झालेले हे आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी (दि. 24) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करणार आहेत.

शनिवारी (दि. 19) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे या विषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी, जय भगवान महासंघ, माळी महासंघ या संस्था व सामाजिक संघटनांचे पदाधिकारींसह नगरसेवक संतोष अण्णा लोंढे, ज्येष्ठ नेते काळुराम अण्णा गायकवाड, आनंदा कुदळे, माजी नगरसेवक सतीश दादा दरेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, बारा बलुतेदार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप गुरव, विशाल जाधव, सुरेश गायकवाड, नेहुल कुदळे, हिरामण भुजबळ, गणेश ढाकणे, वंदना जाधव, अॅड. विद्या शिंदे, कविता खराडे, शंकर लोंढे, ईश्वर कुदळे, विजय दर्शले, शिवदास महाजन, संतोष जोगदंड, सदानंद माने, पी.के. महाजन, रमेश सोनवणे, सदानंद माने, हनुमंत लोंढे, संतोष गोतावळे, मधुकर सिनलकर, नकुल महाजन, कैलास भागवत, कैलास सानप आदी उपस्थित होते.

या निकालामुळे देशातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या सर्व जागा खुल्या प्रवर्गातील गणल्या जातील. त्यामुळे देशभरातील राजकारणात ओबीसींचे अस्तित्व संपुष्टात येईल. यामुळे सर्व ओबीसी समाजांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंडल आयोग आणि घटना दुरूस्तीमुळे ओबीसींना शिक्षण आणि राजकारणामध्ये आरक्षण मिळाले आहे. हे आरक्षण कायम ठेवण्यासाठी यावर महाविकास आघाडी सरकारने त्वरीत कायदेशीर कार्यवाही करावी याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.