योग्य वेळ आल्यावर जयंत पाटलांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार – चंद्रकांत पाटील

0
412

मुंबई, दि, २७ (पीसीबी) –  राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकल्याने माझ्यावर घोटाळ्याचे आरोप करत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

बालेवाडी येथे एक भूखंड खेळाच्या मैदानासाठी राखीव होता. शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांनी ही जागा आपली असल्याची दाखवत प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला. दरम्यान याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले. त्यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली परंतु चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्सची असल्याचा निकाल देत जमिनीवर ३०० कोटींचा प्रकल्प बिल्डरने उभा केला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसने चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत. त्यामुळे बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटीलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली होती.

दरम्यान, चंद्रकात पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकल्याने माझ्यावर घोटाळ्याचे आरोप करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीने केलेले सर्व आरोप चंद्रकांत पाटील यांनी फेटाळले आहेत. इतकेच नव्हे तर वेळ आल्यास जयंत पाटलांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.