योगायोगाने देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत – देवेंद्र फडणवीस

0
299
मुंबई, दि.२८ (पीसीबी) – ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी ही मागणी केली.
त्यांच्या या मागणीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले आहे. समर्थन देताना देवेंद्र फडणवीस यांनी योगायोगाने देशाचे पंतप्रधानदेखील ओबीसी असल्याचे सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हाला या विषयाबद्दल आधी कळवले असते तर आम्ही अधिक माहिती घेतली असती. आम्हाला विश्वासात घेतले असते बरे झाले असते. भुजबळ यांनी मांडलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे त्यांना समर्थनच आहे. ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम राबवताना जनगणना माहिती असेल तर धोरण आखण्यास मदत होते. सातत्याने ही मागणी होत आहे. सर्व पक्षांचे त्याला समर्थन आहे. ठराव केल्यानंतर आपण रजिस्ट्रार जनरलकडे पाठवला. शेवटी तेदेखील अधिकारी आहेत. जे काही नियम आहे त्यानुसार त्यांनी संविधानात तरतूद नाही वैगेरे उत्तरे दिली आहेत. पण हा धोरणात्मक निर्णय आहे. खरे तर देशाच्या पंतप्रधानांना काही जात नसते. पण योगायोगाने देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत. धोरणात्मक निर्णय असल्याने आपण पंतप्रधानांकडे जाऊन विनंती करणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे,”