योगप्रशिक्षक सुरेश जाधव लिखित ‘योगयज्ञ’ पुस्तकाचे प्रकाशन

0
183

पुणे,दि.२९(पीसीबी) : ‘निरामय आरोग्य व मनःशांतीसाठी नियमित योगासनांचा निश्चितच मोठा फायदा आहे. श्री. सुरेश जाधव यांनी लिहिलेल्या ‘योगयज्ञ’ पुस्तकामुळे सर्वांचा योगाभ्यासाकडे कल वाढेल व धकाधकीच्या जीवनशैलीत सकारात्मकतेसह शारीरिक व मानसिक स्वास्थ बळकट ठेवण्यासाठी योगाभ्यासाला प्राधान्य मिळेल’, असे मत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी व्यक्त केले.

महावितरणचे कर्मचारी व योगप्रशिक्षक श्री. सुरेश जाधव लिखित ‘योगयज्ञ’ पुस्तकाचे प्रकाशन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्याहस्ते मंगळवारी (दि. 29) रास्तापेठ येथे आयोजित कार्यक्रमात झाले. ‘महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून दैनंदिन योगाभ्यास करावा. त्यामुळे आरोग्य कायम राहण्यासोबतच कार्यक्षमता देखील वाढीस लागेल’ असेही श्री. तालेवार यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सौ. ज्ञानदा निलेकर, कर्मचारी नेते श्री. तुकाराम ठिंबळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुस्तकाचे लेखक व योग प्रशिक्षक श्री. सुरेश जाधव हे महावितरणमध्ये वरिष्ठ यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेल्या 150 पानांच्या सचित्र पुस्तकामध्ये योगाची पूर्वतयारी, विविध योगासने व त्यातील स्थिती तसेच शास्त्रशुद्ध कृती व फायदे आदींची माहिती देण्यात आली आहे. पुणे येथील एसए पब्लिशिंग हाऊस इंडिया ही संस्था या पुस्तकाची प्रकाशक आहे.

प्रकाशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक श्री. सुरेश जाधव यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करीत या पुस्तकाचे स्वागत केले. कार्यक्रमाला जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत, उपकार्यकारी अभियंता मुकेश जोशी व संतोष पटनी तसेच सुजित विभुते, जनार्दन शिवरकर, बापूराव नरोटे आदींची उपस्थिती होती.