Entertainment

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं निधन

By PCB Author

December 07, 2020

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी आली आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दिव्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या गोरेगावच्या एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, दिव्याच्या मृत्यूची माहिती तिचा जिवलग मित्र युवराज रघुवंशी यांनी दिली. युवराजने सांगितलं की, आज पहाटे 3 वाजता दिव्याचा मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास तिची प्रकृती अचानक खालावली. 3 वाजता डॉक्टर जेव्हा तिला तपासण्यासाठी आले तेव्हा तिचं निधन झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्याच्या मृत्यूमुळे तिच्या घरातील आणि जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे.

दिव्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, दिव्याचा नवरा गगन याचा कुठेही पत्ता लागत नाहीये. गगनने माझ्या मुलीची फसवणूक केली आणि तो फरार झाला असं तिने एका अहवालात म्हटलं आहे. त्याने तिला प्रेमात फसवलं आणि सोडून दिलं असा धक्कादायक खुलासा तिच्या आईने केला आहे.