येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या

0
3070

पुणे, दि. २७ (पीसीबी) – येरवडा कारागृहातील बराकीत एका कैद्याने टॉवेलच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास घडली.

अमोल ज्ञानेश्‍वर कांबळे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल कांबळे हा सराईत गुन्हेगार होता. तो येरवडा कारागृहात मारहाणप्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता. त्यांच्या विरोधात पास्को, विनयभंग तसेच वाहनचोरी आणि मारहाणीचे असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला व्यसन होते. त्यामुळे त्याला कारागृहातील रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी बराकीत असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याने टॉवेलच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, हा घातपात असल्याचा आरोप मयत अमोल कांबळे याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. रविवारी पोलिसांनी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.