‘येताना बॅग भरुन कपडे आणा’; राज ठाकरेंचा मुंबईतील पदाधिकाऱ्यांना हुकूम

0
447

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबईवरुन आज सकाळी ठाण्याकडे रवाना झाले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बॅग भरुन कपडे आणण्यास सांगितलं. राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर हे बॅगा घेऊन ‘कृष्णकुंज’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले.

दरम्यान, राज ठाकरे अमित ठाकरेंसोबत ठाण्याला रवाना झाले असून त्यांच्यासोबत चार ते पाच गाड्यांचा ताफासुद्धा आहे. अर्धे कार्यकर्ते त्यांना मुलुंड टोल नाका इथे भेटतील. तर ठाण्यातील सीकेपी हॉल इथं राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारनंतर राज ठाकरे ऐरोली मार्गे पुण्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत. नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. राज ठाकरे २ ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील. राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९, २० आणि २१ जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे ३० जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली होती.