युवक मराठा महासंघ मराठा युवक युवतींना सर्व क्षेत्रात प्रोत्साहन देणार – दशरथ पिसाळ

0
491

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पहिल्यापासून प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर मराठा समाजातील सर्व युवक-युवतींना शिक्षण, उदयोग, व्यवसाय व व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. त्यावर राज्यभरातील महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत आहेत. वेळोवेळी मराठा समाजाच्या समविचारी संघटनांना बरोबर घेऊन आम्ही आमचे ध्येय गाठणार असल्याचे अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी मंगळवारी (दि. २६) पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी प्रदेश संघटक संतोष लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदय पाटील, शिवानंद लांडगे, संतोष लांडगे, धनंजय जगदाळे, विजय बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.

पिसाळ म्हणाले, “राज्य सरकारने ‘श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची’ अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेताना संपूर्ण शुल्क मागणाऱ्या शिक्षणसंस्था विरुध्द तक्रार करण्यासाठी सर्व विद्यार्थी व पालकांनी पुढे यावे. विद्यार्थ्यांची व पालकांची अडवणूक करणाऱ्या शिक्षण संस्थांना अखिल भारतीय युवक मराठा महासंघ धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांना व युवकांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी महासंघ सर्वोतोपरी मदत करील.

अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना कै. अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे. या वटवृक्षाचे अनेक शाखा, संस्था संघटनांमध्ये रुपांतर झाले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाला करावी लागली. अशीच मराठा समाजाची सर्व शक्ती एकत्र करुन शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण आम्ही मिळवूच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.”