युपी, बिहारमध्ये आघाडी झाली तर भाजपा २०१९ मध्ये जिंकू शकत नाही – राहुल गांधी

0
830

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आघाडी झाली तर भाजपा २०१९ साली लोकसभेची निवडणूक जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आणि तशीच आघाडी बिहारमध्ये आकाराला आली तर भाजपाला १२० जागांवर फटका बसेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आज (शुक्रवारी) लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताचा मूळ स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अन्य पक्षांनी कधीही भारतातील संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. अरब जगतात मुस्लिम ब्रदरहूडची जी विचारसरणी आहे भारतात आरएसएस सुद्धा त्याच मार्गाने जात आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सर्जिकल स्ट्राईक लष्करानेच केला त्यात काही दुमत नाही असे राहुल गांधी म्हणाले. आसाममध्ये एनआरसीची सुरुवात आम्हीच केली. ती आमचीच कल्पना होती. एनआरसीची अंमलबजावणी कशी करायची हा कळीचा मुद्दा आहे. एनआरसीच्या यादीत समावेश न केलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे असे ते म्हणाले. व्यावसायिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्यांची निराशा झाली असून आम्हाला पाठिंबा द्यायची त्यांची इच्छा आहे, असे राहूल गांधी म्हणाले.