युती तुटल्यानंतर त्यांचा विद्रूप, भेसूर चेहरा दिसू लागला

0
208

मुंबई, दि. १५(पीसीबी): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसंवाद यात्रेत जोरदार भाषण करत भाजपवर शरसंधान केले. बांद्रा कुर्ला काॅम्प्लेक्स येथे झालेल्या विराट सभेत ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा पुकारा केला. आमची 25 वर्षे भाजपसोबत युतीत सडली, या वाक्याचा त्यांनी पुनरूच्चार करत किती भयानक पद्धतीने ते अंगावर येतात, यावर विश्वास बसत नाही. युती तुटल्यानंतर त्यांचा विद्रूप, भेसूर चेहरा दिसू लागला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

-आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.

-आमचे हिंदुत्व म्हणजे देवळात घंटा बडविणारे नाहीतर अतिरेक्यांना तुडविणारे आहे. ज्यांनी घंटा बुडविल्या त्यांना काय मिळालं घंटा? ज्यांना महाराष्ट्र काय आहे हे कळलं नाही त्यांच्यासाठी बोलावे लागत आहे.

– खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेले पक्ष आपल्या सोबत होता. तो देशाची दिशा बदलत आहे.

– एक मे रोजी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस हे चुकून खरे बोललो. मुंबई स्वतंत्र करणार, असल्याचे त्यांच्या मालकांचे म्हणणे असल्याचे ते बोलून गेले. पण तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी ती तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. जो कोणी या मुंबईला वेगळा करायचा प्रयत्न करेल त्याचे तुकडेतुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकदाही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हता. होता पण जनसंघ म्हणून होता. माझे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या पाच सेनापतींत होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, यासाठी लढणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीतून पहिल्यांदा बाहेर पडला तो जनसंघ. म्हणजे यांचे बाप! मुंबई स्वतंत्र करण्याचा त्यांचा तेव्हापासूनचा प्रयत्न आहे. फडणविसांनी एक मे रोजी घेतलेल्या सभेत ते पोटातले ओठावर आहे.