Banner News

युती झाल्यास मावळमधून जिंकणाऱ्याला उमेदवारी द्या; अन्यथा पराभवास आम्हाला जबाबदार धरू नका – आमदार लक्ष्मण जगताप

By PCB Author

December 21, 2018

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली तर उत्तमच आहे. युतीच्या जागा वाटपात भाजपने मावळ मतदारसंघातून आपणाला उमेदवारी दिली, तर निश्चितपणे निवडणूक लढवणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तर निवडणुकीत जिंकून येणाऱ्याला उमेदवारी देण्यात यावी. जे बुथप्रमुख सुद्धा नेमू शकत नाहीत, अशांना उमेदवारी देऊन पराभव झाला, तर शिवसेनेने निवडणुकीनंतर आम्हाला जबाबदार धरू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक नामदेव ढाके, सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल, एवढी ताकद पक्षाची निश्चितपणे निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्षांसाठी फलदायी ठरणार आहे. युतीच्या जागा वाटपात मावळ मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आणि पक्षाने आपणाला उमेदवारी दिली, तर आपण नक्की निवडणूक लढवणार आहे. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तर त्या पक्षाने निवडणुकीत जिंकणारा उमेदवार द्यावा. नगरसेवक निवडून आणण्याची गोष्ट दूरच राहिली. ज्यांना बुथप्रमुख सुद्धा नेमण्यासाठी कार्यकर्ते मिळत नाहीत, अशांना उमेदवारी देऊन शिवसेनेने आपला पराभव पत्करू नये. तसे झाल्यास शिवसेनेने नंतर आम्हाला जबाबदार धरू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.”