युतीसाठी शिवसेनेच्या भाजपसमोर चार अटी; अमित शहा, उध्दव ठाकरेंची फोनवरून चर्चा  

0
2072

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेशी युती करण्यासाठी घाई करत असताना शिवसेनेने युतीसाठी चार कठोर अटी लादल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. याबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.   

शिवसेनेचा मुख्यमंत्री  असेल, विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत एकत्र घेण्यात यावी, लोकसभेच्या शिवसेनेला २५ जागा सोडण्यात याव्यात तर भाजपने शिवसेनेसाठी विधानसभेच्या १५० जागा सोडाव्यात, अशा चार अटी शिवसेनेने भाजपसमोर ठेवल्या आहेत.   महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत भाजपने २६, तर शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या. त्यावेळी भाजपने २३, तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या.

दरम्यान, शहा यांचे उद्धव यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सायंकाळी आंध्रभवन येथे जाऊन चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. नायडू यांच्या उपोषणाच्या निमित्ताने विरोधकांनी पुन्हा एकजुटीचे दर्शन घडविले. त्याच मंचावर हजेरी लावून राऊत यांच्याद्वारे शिवसेनेने भाजपवर दबावतंत्राचा वापर केल्याचे बोलले जात आहे.  त्यामुळे शिवसेनेच्या अटी भाजप मान्य करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.