युतीमध्ये शिवसेनेचा एक आमदार जास्त आला तरी त्यांचा मुख्यमंत्री होईल – चंद्रकांत पाटील

0
1084

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी भाजपसोबत युती करावी. ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनेल. शिवसेनेचे आमदार भाजपपेक्षा जास्त असतील, तर त्यांचा मुख्यमंत्री होईल. शिवसेना भाजपसोबत आली, तर आगामी निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे शिवसेनेने भाजपसोबतच युती करून पुढील निवडणुकांना सामोरे जावे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची १५ वर्षांची सत्ता योग्य होती असे शिवसेनेला वाटते काय? राजकारणात भावनेला महत्त्व नसते. महाराष्ट्रात चार वर्षांत झालेल्या बहुतांश निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. काही ठिकाणी स्वतंत्र लढूनही भाजपला विजय मिळाला आहे. त्याचबरोबर या निवडणुकांमध्ये शिवसेनेलाही अनेक ठिकाणी चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसला मदत होईल असे वागू नये. ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरलेले आहे. त्यामुळे शिवसेनेने आधी भाजपसोबत युती करावी. ज्या पक्षाचा एक आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनेल. शिवसेनेचे आमदार जास्त असतील, तर त्यांचा मुख्यमंत्री होईल.

मुंबई महापालिकेसह ठाणे, मिरा-भाईंदर व अन्य महापालिकांच्या निवडणुकांची आकडेवारी पाहिल्यास शिवसेना-भाजपचे यश दिसून येते. राज्यात युतीचीच ताकद मोठी आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र लढले, तर समोर कोणीच उरणार नाही. शिवसेनेने राज्यातील नागरिकांच्या हितासाठी काँग्रेसला मदत होईल, असा विचार करू नये. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून ४२ जागा जिंकलेल्या आहेत. उरला प्रश्न केवळ सहा जागांच्या वाटपाचा. तो तर एका चहाच्या चर्चेत संपेल. जागा वाटपाचा प्रश्न संपला की युतीने न जिंकलेल्या सहा जागाही आगामी निवडणुकीत आरामात खिशात घालता येतील. विधानसभेलाही भाजप आणि शिवसेनेच्या मिळून १८५ जागा आहेत. एकत्र आलो तर आगामी निवडणुकीत आणखीन १५ ते २० जागा सहज मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”