युतीमध्ये मावळ मतदारसंघ भाजपकडे घ्या; चिंचवड आणि पिंपरी मतदारसंघातील भाजप नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
809

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती झाल्याने मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपला घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी आग्रही आहेत. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. मावळ मतदारसंघात शिवसेनेचा विजय होणे अवघड असल्याने हा मतदारसंघ भाजपने स्वतःतकडे घ्यावा, अशी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जोरदार मागणी केली. त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या भावना ऐकून घेत युतीमध्ये मावळ मतदारसंघ जिंकण्याच्याच उद्देशाने योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

भाजप आणि शिवसेनेने लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक सुद्धा युती करून लढण्याची घोषणा केली. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजप २५, तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत फिफ्टी फिफ्टी मतदारसंघ लढवण्याचा दोन्ही पक्षांचा निर्णय झाला आहे. किती जागा लढवायच्या हे निश्चित झाले असले, तरी कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाला याबाबत अद्याप तरी निर्णय झालेला नाही. येत्या दोन-चार दिवसांत भाजपला कोणते आणि शिवसेनेला कोणते मतदारसंघ हे निश्चित केले जाणार आहेत. त्याबाबत दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे. त्यामुळे युती झाली तरी उमेदवार निवडून येण्याची शाश्वती नसणाऱ्या मतदारसंघांची वाटपावेळी आदलाबदल होते का? याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ मतदारसंघाबाबत हीच स्थिती आहे. या मतदारसंघात भाजपची ताकद प्रथम क्रमांकाची आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. परंतु, त्यांनी गेल्या पाच वर्षांत स्वतःची व पक्षाची राजकीय ताकद कितपत वाढवली याबाबत शंका असल्याने ते युतीचे उमेदवार म्हणून उभे राहिल्यास पुन्हा निवडून येतीलच याची खात्री नसल्याचे चित्र आहे. श्रीरंग बारणे हे उमेदवार असल्यास राष्ट्रवादीचा विजय सोपा होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळेच भाजपचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी जोरदार आग्रही आहेत. भाजपच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच श्रीरंग बारणे हे उमेदवार असल्यास पराभवाला आम्हाला जबाबदार धरू नका, अशा आशयाचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.

आता चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मावळ मतदारसंघ भाजपला घेण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मावळ मतदारसंघात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला साथ मिळणार नाही. महापालिका निवडणुकीत ते स्पष्ट झालेले आहे. परिणामी लोकसभेला या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव होऊ शकतो. युतीचा एक हक्काचा मतदारसंघ गमावल्यास दोन्ही पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होणार आहेत. शिवसेनेसोबत भाजपचेही राजकीय नुकसान होईल. त्यामुळे मतदारसंघ वाटपात मावळ भाजपच्या घेण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेत युतीमध्ये योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.